॥ श्री ॥
                   ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥
                   जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥
बेळगावातील नामवंत संत साहित्यिक "विनामूल्य ज्ञानेश्वरीकर्ते“ श्री बाळासाहेब जांगळे यांच्या साहित्याची ओळख करून देण्यासाठी जी आम्ही ही वेबसाईट चालू केली आहे, त्याचे कारण आहे की आयुष्यभर त्यानी ज्या संतसाहित्याचा अभ्यास केला व त्यातील अमृतकण वेचून सार्‍या वाचकांवर जो अमृत वर्षाव केला त्या वर्षावात तुम्हालाही भिजता याव ही आमची इच्छा आहे.
इतर धर्मीयांचे धर्मग्रंथ कोणाही जिज्ञासूला सहज, सुलभ व मोफत सुद्धा उपलब्ध करून देण्यात येतात. याउलट आपले धर्मग्रंथ मात्र दिवसेंदिवस दुर्मिळ, महाग होत चालले आहेत ही खंत त्याना असायची. वास्तविक पाहता संत वांगमय हा आपला अनमोल ठेवा. जणू अमृताचे कुंभच. यात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, जीवनशास्त्र व अध्यात्मशास्त्र ओतप्रोत भरलेल आहे, अस त्याना वाटायाच. हे वांगमय अनंत रत्नाकरासारख असून त्यात सुभाषित, सुविचार, सिद्धांत वचनरूपी रत्नाच्या जणू खाणीच आहेत. यात डुबकी मारुन माझ्या कुवतीप्रमाणे जी रत्न माझ्या हाती लागली ती वाचकाना सादर करण्याचा प्रयत्न मी करतोय अस ते स्वत:हच म्हणायचे. पण या रत्नाकरात पोहताना त्यानी घेतलेले अपार कष्ट आम्हाला माहीत आहेत. रत्नाकरात डुबकी मारुन रत्न आणन म्हणाव तितक सोप नसत. वरुन शांत दिसणार्‍या रत्नाकरात डुबकी मारल्यानंतर समजत की त्यात अनेक समस्या आहेत शिवाय क्रूर जलचरही आहेत. या सार्‍यांमधून पोहून ती रत्न त्यानी वाचकांपर्यंत कशी आणली ते आम्ही पाहील आहे.
अंधश्रद्धाळूपणे फक्त ग्रंथांच पारायण करण्यापेक्षा त्यातील विचारांच मनन, चिंतन करून ते वाचकानी आचरणात आणावेत अस त्याना वाटे. “एकतरी ओवि अनुभवावी" या विचारांचे ते होते. नाहीतर !! जैसे कल्पतरूतळवटी बैसोनी झाली देतसे गाठी !! मग नैवेद्या निघे किरीटी ! दैन्यचि करू !! अशी स्तिथि होते. म्हणून त्यानी या रत्नाकराच मंथन करून जो अमृतकुंभ हाती लागला तो जिज्ञासू, अभ्यासू वाचकाना मोफत किंवा अल्पमूल्यात दिला.
दोन तपाहून अधिक काळ त्यानी संतसाहित्य सेवेचे व्रत घेतले होते. लोकाश्रयाणे सुमारे 11 लाख रुपयांच्या ग्रंथांचे विनामूल्य अथवा नाममात्र मूल्यात वितरण केले. त्याबद्दल त्याना अनेक पुरस्कारही मिळाले. पण त्यांच्या निर्वानानंतर हे कार्य थांबू नये व त्या अमृतकनांच्या वर्षावात इच्छुकाना भिजता याव म्हणून हा महाकुंभ आज आम्ही तुमच्या हाती देत आहोत.